Makhana recipe in marathi In 2022|मखाणा रेसिपी

Makhana in marathi:आजही मखाणा हा पदार्थ बऱ्याच जणांना माहित नाहीये. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे मखाना म्हणजे कमळाच्या बिया होय. हा मखाणा अतिशय पौष्टिक आहे आणि याचे बरेचसे फायदे देखील आहेत.अगदी गर्भवती महिला,लहान मुले,प्रौढ व्यक्ती सर्वच जण मखान्याचे सेवन करू शकतात. आज मी तुम्हाला मखान्याच्या काही रेसिपीज सांगणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला त्या नक्की आवडतील.

Makhana recipe in marathi
Makhana recipe

Makhana recipe in marathi(मखाणा रेसिपी):

१)रोस्टेड मखाणा:

ही अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप चविष्ट बनते. तसेच ही बनाविण्यासाठी फारसा वेळही लागत नाही आणि लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वानाच आवडते.

साहित्य : मखाणे-२ वाटी,तूप १ टेबलस्पून,चवीपुरते मीठ

कृती : सर्वप्रथम एक पॅन गरम करत ठेवावा. त्यानंतर त्यात तूप टाकावे. तूप चांगले गरम झाल्यावर त्यात मखाणे टाकावे आणि ब्राउनिश होईपर्यंत रोस्ट करावे.गॅसचा फ्लेम हा कमी असावा जर हाय फ्लेम वर मखाणे रोस्ट केले तर ते जळण्याची शक्यता असते. म्हणून मंद गॅसवरच मखाणे रोस्ट करावेत. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकावे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडे जिरे आणि थोडी साखर देखील तुम्ही टाकू शकता. अशाप्रकारे तुमचे टेस्टी आणि हेल्दी  रोस्टेड मखाणे तयार.

2)मखाण्याची खीर:

आज मी तुम्हाला पौष्टिक अशा मखाण्याच्या खीरीची रेसिपी सांगणार आहे.ही खीर उपवासाला देखील चालते. तसेच यात खूप ड्रायफ्रूट्स चा समावेश करता येतो आणि ही खीर सर्वानाच आवडते.

साहित्य

दूध- १/२ लिटर,मखाणे-१ कप,वेलची पावडर-१/४ चमचा,साखर-१/४ वाटी(आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता), ड्रायफ्रूट्स-१/२ वाटी,केशर-६-७ काड्या

कृती

सर्वात प्रथम दूध तापण्यासाठी ठेवावे. दूध थोडेसे आटवून घ्यावे. नंतर एका पॅन मध्ये मखाणे थोडेसे भाजून घ्यावेत. नंतर थंड झाल्यावर मखान्याची पावडर करून घ्यावी. ही पावडर जास्त बारीक करू नये. त्यानंतर ही पावडर आटवलेल्या दुधात टाकावी आणि गॅस लावून थोडे शिजू दयावे. त्यानंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे साखर,वेलची पावडर,केशर टाकावे. त्यानंतर हे सर्व शिजल्यावर एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. नंतर त्यात सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स टाकावे. अशा प्रकारे झटपट आणि पौष्टिक अशी मखाण्यांची खीर तयार.

3)मखाण्याची भाजी

रोजरोज त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक थोडीशी वेगळी आणि चटपटीत अशी मखाण्याच्या भाजीची रेसिपी सांगणार आहे.

साहित्य:

मखाणे – १ वाटी,कांदे-२,टोमॅटो-२,हिरव्या मिरच्या-२,बेसन-२ चमचे,लसूण-८-१० पाकळ्या,आले-१ इंच,काजू-पाव वाटी,दालचिनी-१,वेलची-२,लवंग-२,धना  पावडर-१ चमचा,गरम मसाला-१ चमचा,कसुरी मेथी-पाव चमचा

कृती:

सर्वात प्रथम एका पॅन मध्ये तेल तापण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात मखाणे टाकून ४ ते ५ मिनिटे परतून घ्यावे. त्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून घ्यावे. नंतर त्या  पॅनमध्ये थोडेसे बेसन परतून घ्यावे. नंतर ते एका प्लेट मध्ये काढून घ्यावे. त्यानंतर पुन्हा पॅन ठेऊन त्यात २ चमचे तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात दालचिनी,वेलची आणि लवंग टाकावी. नंतर बारीक चिरलेली लसूण टाकावी.त्यांनतर त्यात काजूचे तुकडे,आले आणि हिरव्या मिरच्या टाकून थोडेसे परतून घ्यावे. त्यांनतर त्यात  कांदा आणि टोमॅटो टाकून थोडेसे परतून घ्यावे.

त्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यावे. नंतर ते थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे.नंतर पॅन मध्ये पुन्हा तेल गरम करण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यात थोडेसे जिरे टाकावे. त्यानंतर त्यात थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकावा. नंतर थोडीशी हळद,तिखट,धन पावडर टाकून थोडेसे परतून घ्यावे. त्यानंतर त्यात मिक्सर मध्ये जी पेस्ट केली आहे ती टाकावी. त्यानंतर हे सर्व मिक्स करून त्यात थोडेसे पाणी टाकावे.

नंतर चवीपुरते मीठ टाकावे आणि झाकण लावून बारीक गॅसवर शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात बेसन टाकावे. त्यानंतर त्यात अजून थोडेसे पाणी आणि १ चमचा गरम मसाला टाकून शिजू द्यावे. नंतर हातानेच थोडीशी क्रश करून कसुरी मेथी टाकावी. आणि सर्वात शेवटी त्यात फ्राय केलेले मुखाने टाकावेत आणि झाकण ठेवून पाच मिनिटे बारीक गॅसवर शिजू द्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. अशाप्रकारे आपली मखाण्याची भाजी तयार.

४)मखाण्याचे लाडू(makhana ladoo recipe in marathi) :

लाडू म्हटले की जवळजवळ सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. आज आपण पौष्टिक आणि स्वादिष्ट अशा मखाण्याच्या लाडूंची रेसिपी बघणार आहोत.

साहित्य :

बदाम-१/२ कप,काजू-१/२ कप,पिस्ता-१/४ कप,किसलेले खोबरे-१/२ कप,खारीक पावडर किंवा खारकेचे तुकडे-१/२ ,मखाणे -३ कप,गूळ-दीड कप चिरलेला  ,तूप-२ चमचे

कृती :

सर्वात प्रथम एक पॅन गरम करत ठेवावा. त्यानंतर त्यात बदाम,काजू आणि पिस्ते क्रमाक्रमाने एक एक करून ३ ते ४ मिनिटे सुके भाजून घ्यावेत. त्यानंतर १/२ कप किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे. खोबरे थोडा  वेळच भाजावे. जास्त वेळ भाजले असता त्याला कडवटपणा येण्याची शक्यता असते. त्यानंतर थोडीशी खारीक पावडर भाजून घ्यावी. नंतर त्या पॅन मध्ये २ चमचे तूप टाकून मखाणे रोस्ट करून घ्या. मखाणे कुरकुरीत होईपर्यंत रोस्ट करून घ्यावेत. त्यांनतर मखाण्यांची पावडर करून घ्या. नंतर एक एक करून बदाम पावडर,काजू पावडर,पिस्ता पावडर करून घ्या.

त्यानंतर त्यात भाजलेले खोबरे टाका. याची जर तुम्हाला पूड करायची असेल तर करू शकता. त्यानंतर मखाण्यांची पावडर,खारीक पावडर,बदाम पावडर,काजू पावडर,पिस्ता पावडर,भाजलेले खोबरे हे सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर एका कढईत २ चमचे तूप टाकून त्यात चिरलेला गुळ टाका. गूळ वितळेपर्यंत ते व्यवस्थित ढवळून घ्या. गूळ वितळल्यावर तयार केलेली पावडर टाकून मिक्स करून घ्या. नंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. मिश्रण गरम असतानाच लाडू पटापट वळून घ्यावेत. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळता येत नाहीत. अशा प्रकारे आपले मखाण्याचे लाडू तयार.

महत्वाची प्रश्नोत्तरे(Frequently Asked Questions)

रोस्टेड मखाणे साधारणपणे किती वर्षाच्या मुलांना देऊ शकतो?

रोस्टेड मखाणे साधारणपणे १ वर्षाच्या पुढील मुलांना देऊ शकतो.

मखाण्याचे लाडू थंड झाल्यावर वळता येत नसतील तर काय करावे?

जर मखाण्याचे लाडू थंड झाले असतील आणि वळता येत नसतील तर ते मिश्रण थोडेसे गरम करून घ्यावे आणि लाडू वळावेत.

मी केलेली एक छोटीशी कविता

पौष्टिक आणि स्वादिष्ट असा हा मखाणा
आहे लहान मुलांपासून सर्वांच्या आवडीचा

जेव्हा समोर असते मखाण्यांची खीर
नाही राहत मग कुणालाच धीर

जर येत असेल कोणालाही रडू
द्यावे त्याला प्लेटमध्ये मखाण्यांचे लाडू

मखाण्यांच्या सर्वच रेसिपी आहेत खूपच छान
म्हणूनच मखाण्याचे सर्वच जण काढतात नाव

तर आज मी तुम्हाला मखाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज( Makhana recipe in marathi)सांगितल्या मला खात्री आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा:

Benefits of Makhana | मखाना खाण्याचे फायदे | Neha K | Marathi | #makhana

Balguti Ingredients In marathi In 2022|बाळगुटी कशी द्यावी?

पालकत्व हा एक मराठी ब्लॉग असून यामध्ये मी माझ्या pregnancy पासून ते आत्तापर्यंतचा प्रवास शेअर केला आहे. माझे नाव सुजिता म्हात्रे(Sujita Mhatre) आहे आणि मी नवी मुंबई मध्ये राहते. मी C. K.T. कॉलेग मधून MBA (Master of Business Administration) केले आहे. मला सान्वी नावाची ३ वर्षाची मुलगी आहे. या ब्लॉग मध्ये तिला वाढवताना मला आलेला गोड अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.

Leave a Comment